छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कॉलेज, रुग्णालय आणि गर्दीच्या ठिकाणच्या पार्किंगमधून बनावट चाव्यांच्या साहाय्याने दुचाकी चोरणार्या एका त्रिकुटाला सिडको पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी करत पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून चोरीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
शेख जुनेद शेख समी (२४, रा. माणिकनगर, नारेगाव), परवेज सय्यद आमीर (२५, रा. दानिश पार्क, नारेगाव) आणि नारेगाव येथील गॅरेजचालक शेख जमीर शेख लतीफ (२८, रा. वसमत, ह.मु. नारेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील जुनेद आणि परवेज हे दोघे स्लॅबचे कामगार आहेत.
अशी उघडकीस आली चोरी
आंबेडकरनगर येथील परमेश्वर श्रीराम रोठे यांची दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी ५ जुलै रोजी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळासह परिसरातील ५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपींचे चेहरे स्पष्ट झाल्यानंतर खबर्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवण्यात आली.

















